Thursday, January 20, 2011

मंत्रालयात रणधुमाळी !

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या निवडणुकांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे याही निवडणुका जातीपातीच्या राजकारण करूनच खेळल्या जातात. किंबहुना त्या जातीपातीचे राजकारण करूनच जिंकता येतात. सध्यातरी असे चित्र आहे. पूर्वी काय होते देव जाणे. पण अवघे शंभर मतदार असणा-या या संघाच्या निवडणुका आणि त्या निमित्ताने होणारे राजकारण राजकारण्यांनाही लाजवणारे आहे. यावर्षी शशिकांत सांडभोर आणि प्रवीण पुरो हे दोन पत्रकार अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत. वर्षभर त्यांचे लॉबिंग सुरू झाले आहे. आता त्यांना आपण अध्यक्ष व्हावे असे वाटू लागले आहे. त्यामुळे आपला टूर्स आणि टड्ढॅव्हल्र्स व इतर व्यवसाय अधिक तेजीत चालू शकतील, असे त्यांना वाटते आहे. दुसरे उमेदवार शशिकांत सांडभोर ते सध्या टिव्ही जर्नेलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तरी त्यांना विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाचा मोह का पडला आहे त्यांनाच माहीत नसेल. मागच्यावर्षी त्यांनी प्रयत्न केला पण तो फसला. आता पुन्हा ते आपली लॉबी गोळा करू लागले आहेत. पण एकीकडे ते मतदार गोळा करीत जातात आणि दुसरीकडे आपल्या फाटक्या तोंडाने सगळेच गमावत जातात. मेहनत करणारा, अभ्यास असलेला आणि चवळीतून आलेला हा पत्रकार पण त्याने तोंड उघडले की सगळ्याची किमत शून्य होते. विशेष म्हणजे या निवडणुकांची चर्चा सुरू झाली की एका माणसाचा सर्वजण शोध घेतात तो माणूस म्हणजे नितिन सावंत. पूर्वी म्हणे नितिन सावंत म्हणेल तो माणूस निवडून यायचा. पण आता त्यांना कोण विचारत नाही. त्यांच्याकडे एक गट्टा मते राहिलेली नाहीत. सध्या सामनाने त्यांना त्या बिटवरही ठेवलेले नाही. तरीही हे उमेदवार त्यांचा आशीर्वाद घ्यायला का जातात, हे ही न सुटलेले कोडे आहे. असाच कोकणातील एक माणूस म्हणजे किरण नाईक. निवडणूक लढवणारा प्रत्येक उमेदवार त्यांचीही मनधरणी करतो. पण किरण नाईक यांचीही अवस्था नितिन सावंत सारखीच आहे.
यावेळी सुरेंद्र गांगण आणि संजीव शिवडीकर यांच्यासारखे चागंले पत्रकार या निवडणुकीत उतरले आहेत. टीका करणारी सुरेंद्रसारखी माणसं अशा सिस्टममध्ये यावी लागतात. त्यांना आत आल्याशिवाय कळंत नाही की, बाहेरून बोलणे किती सोपे असते ते. त्यांना म्हणे इथला भ्रष्टाचार निपटायचा आहे. पाहू आम्ही त्यांचा सत्कारच करू.
एकूण काय तर मंत्रालयात आता पत्रकारांच्या राजकारणाने वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारांची मनधरणी आता सुरू झाली आहे. पाट्र्याही दिल्या जातील.
बरं हा सगळा लढा कशासाठी याचे उत्तर मिळत नाही पण अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मिळणारी बॅग आणि दिवाळी गिफ्ट याच्यातच या चुरशीचे गुपीत वर्षानुवर्षे दडलेले असावे असा जाणकरांचा अंदाज आहे.