Sunday, January 2, 2011

कुबेरांचा षटकार् !

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकसत्ताच्या संपादकीय पानावर गिरिश कुबेर यांनी ८४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सकाळचे समुह / मुख्य संपादक उत्तम काबंळे यांच्यावर लिहिलेला विशेष लेख प्रसिद्ध झाला आणि पत्रविश्वात चर्चांना चांगलेच उधाण आले.गिरिश कुबेर यांचा उत्तम कांबळे यांच्यावरील लेख आपल्या वाचनात आला असेलच

-

अन्यथा :कांबळे उत्तम झाले!

 नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उत्तम कांबळे यांनी मराठी सारस्वतांची, समीक्षकांची जी काही गोची केली आहे, तिला तोड नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावर चर्चा, टीकाटिप्पणी होणे ही आपली परंपरा. पण यावेळी एक ब्र नाही निघाला कांबळे यांच्या साहित्य संमेलनाच्या भाषणावर. आता काहींना असे वाटायची शक्यता आहे की या सार्वत्रिक शांततेचे कारण कांबळे यांच्या साहित्यिक उंचीत दडलेले आहे. पण तसे नाही. या शांततेच्या मागे आहे ती कांबळे याची व्यावसायिक खुर्ची. कांबळे नुसते साधे साहित्यिक नाहीत. ते एका दैनिकाचे संपादक आहेत. त्यामुळे अनेक लेखकुंनी विचार केला, त्यांना कशाला दुखवा. उद्या त्यांच्या पेपरातल्या एखाद्या साप्ताहिक सदरासाठी, ते जमत नसेल तर रविवार किंवा एखाद्या विशेष पुरवणीसाठी त्यांच्याकडे आपल्याला जावे लागेल. कांबळे यांच्यावर टीका केली तर यावर पाणी सोडावे लागणार. परत त्याच्या जोडीला आपल्यातलाच कोणी गेल्यावर प्रतिक्रिया छापण्यासाठी आपल्याला मान्यवर म्हणून फोन येणार नाहीत आणि वर वर्धापन दिनाच्या पानसुपारीला बोलावणारही नाहीत, बोलावल्यास आपला फोटो छापणार नाहीत, अशीही भीती अनेकांना चाटून गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतके सगळे धोके पत्करण्यापेक्षा त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणे टाळल्याने काही जग बुडत नाही असा सुज्ञ विचार आपल्या साहित्यिक मंडळींनी केला असावा. पण हा प्रश्न नुसता या गरीब बिचा-या साहित्यिकांचा नाही. संपादक कांबळे आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले असल्याने अनेक प्रश्न आता नव्याने उपस्थित होणार आहेत. आता पुढच्या वर्षभराच्या काळात साहित्य मंहामंडळावर समजा कोणी टीका केली तर कांबळे यांचे वर्तमानपत्र नक्की काय भूमिका घेणार. वर्षभर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला गावगन्ना भाषणे देत फिरावे लागते. ते काम आता कांबळे संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने करणार की एका वर्तमानपत्राचे संपादक या भूमिकेतून. परत या कालावधीत कांबळे यांच्यातला साहित्यिक कोठे असणार आणि संपादक नक्की कोणत्या टप्प्यावर जागा होणार, हे इतरांना कळणार कसे. एरवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला ते संमेलन संपले की तितका मान दिला जातोच असे नाही. पण कांबळे यांचे तसे नाही. यंदा ही डबल बॅरल गन आहे. त्यामुळे ती जेथे कुठे वाजेल तेथे इतरांना नाही तरी त्यांच्या वर्तमानपत्राच्या वार्ताहरांना त्याची खबरबात घ्यावीच लागणार. कांबळे यांनी आपल्या भाषणात अन्यही काही महत्वाच्या विषयांना स्पर्श केला आहे, त्याचीही दखल घ्यावी लागेल. उदाहरणार्थ कांबळे विचारतात की नद्या नाले डोंगर, जंगले, धनिकांच्या सात बारावर जात असतील तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल.शब्दशः लाख मोलाचा सवाल आहे हा. पण त्यातून उपप्रश्न निर्माण होतो. तो असा की कांबळे यांनी हा सवाल साहित्यिक म्हणून विचारला की संपादक म्हणून. साहित्यिक म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला असेल तर संपादक या नात्याने त्यांना त्याचे उत्तर हवे तेव्हा मिळू शकले असते. आणि दुसरा मुद्दा असा की कांबळे यांचे वर्तमानपत्र ज्या शहरातून प्रकाशित होते त्या शहराला खेटूनच लवासा नावाचा प्रकल्प उभा रहात आहे. त्याची माहिती कदाचित साहित्यिक कांबळे यांना नसेलही. पण संपादक कांबळे यांना ती नक्की असेल. तर त्या लवासा प्रकल्पात अनेक आदिवासींची जमीन घेतली गेली असा आरोप आहे. त्या बाबत कांबळे यांनी कधी प्रश्न उपस्थित केल्याचे ऐकिवात नाही. या लवासा प्रकल्पासंदर्भात कांबळे यांची भूमिका काय, हा प्रश्नही या निमित्ताने त्यांना विचारायला हरकत नसावी. परत कांबळे असेही म्हणाले की, समाजात सुरू असलेल्या आर्थिक बदलामुळे नवे वर्ग किंवा समाज घटक तयार होत आहेत. विस्थापित, धरणग्रस्त, स्थलांतरित, प्रकल्पग्रस्त, सेझग्रस्त वगैरे वगैरे. बरोबर आहे कांबळे यांचेच म्हणणे. पण प्रश्न तोच. हा सवाल साहित्यिक म्हणून की संपादक म्हणून.आपल्या भाषणात कांबळे यांनी विचारस्वातंत्र्यावर चहुबाजुंनी होणाऱ्या आक्रमणाचीही दखल घेतली. तेही योग्यच झाले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षांनी अशी भूमिका घेण्याला देदीप्यमान इतिहास आहे. कधी कुणाच्या लेखनामुळे कुणाच्या भावना दुखावतील आणि स्फोटाचं रूप घेउन बाहेर पडतील, याचा नेम राहिलेला नाही. साहित्यिकांच्या लेखण्यांवरही मूलतत्ववाद आक्रमण करत आहे, असे कांबळे यांचे म्हणणे आहे. त्याबाबत कोणाचेही दुमत असायचे काहीही कारण नाही. प्रश्न आहे तो अशा आक्रमणांच्या निवडक निषेधाचा. राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांच्या आशिर्वादाने काही अतिरेकी संघटना सध्या फोफावलेल्या आहेत. पत्रकार, संपादकांवर हल्ला करण्यापासून ते पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेत नासधूस करण्यापर्यंत या संघटनांची मजल गेली आहे. या संघटनांना चार खडे बोल संमेलनाध्यक्ष कधी सुनावणार, याकडे आता समस्त सारस्वत परिवार नजर ठेवून आहे.पण अर्थात या त्रुटीदर्शनामुळे उत्तम कांबळे यांच्या मोठेपणाला बाधा पोहोचणार नाही. कांबळे काही नुसतेच थोर नाहीत. ते थोर थोर आहेत. त्यांच्या आत्मविश्वासाला दाद द्यवी तितकी कमीच. नव्या शतकाने आणलेल्या आधुनिकतेच्या संदर्भात बोलताना त्यांनी जाहीरच करून टाकले मी. म्हणजे ते.स्वत/ एक युग आहे म्हणून. आणि हे मत काही त्यांनी ठाण्याच्या साहित्य संमेलनातच व्यक्त केले असे नाही. याआधीही त्यांनी अशाच प्रकारची भावना व्यक्त केली होती. म्हणजे कांबळे यांना युगकर्तेच म्हणायला हवे, यात शंका नाही. तर आता कांबळे यांचे युग सुरू झाले आहे. या युगब्दास काही नतद्रष्टांनी नथुराम गोडसे, दादोजी कोंडदेव आदींचे विषय काढून खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण तो काही तितकासा यशस्वी झाला नाही. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत नथुराम गोडसे याचा आदरयुक्त उल्लेख झाल्याने गंभीर वाद निर्माण होईल की काय, अशी शंका अनेकांना आली. पण तो प्रश्न राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी हाती घेतल्याने मुदलातच निकालात निघाला. तसा तो निघेपर्यंत आव्हाड यांनी दूरचित्रवाहिन्यांसमोर आगपाखड केली आणि आपल्या सात्विक संतापाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. तो अगदीच केविलवाणा ठरला. कारण सात्विक संताप कसा व्यक्त झाला या पेक्षा तो कोणी व्यक्त केला, यालाच महत्व असते. एरवी हे साहित्य संमेलन म्हणजे पतंग उडवण्याची स्पर्धाच ठरले. हे पतंग बदवण्यात कांबळे यांच्या खालोखाल यशस्वी ठरले ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. मराठी कलाकृतीला नोबेल मिळायला हवे, परत पुन्हा एकदा ज्ञानेष्टद्धr(२२४)वरीसारखी कलाकृती मराठीत जन्माला यावी, अशा इच्छा व्यक्त करण्याचे धाष्टर्य़ त्यांनी दाखवले. यावरूनच त्यांचा मराठी साहित्याचा संबंध किती तुटलेला आहे, याची जाणीव व्हावी. त्यांना काय माहीत मराठी कथा, कादंबरी लेखक सध्या मानवी संबंधांचा लैंगिक दृष्टीकोनातून वेध घेण्यातच आणि तो घेऊन झाला की लैंगिक संबंधांची मानवी संबंधांच्या अनुषंगाने मांडणी करणारे साहित्य प्रसवण्यातच मग्न आहेत. असो. पण साहित्य संमेलन उत्तम झाले. आता कांबळे यांना वीर सावरकर नगरीतून आपले ज्वालाग्राही विचार मांडावे लागले हा काव्यगत न्याय म्हणायचा की साहित्यिक योगायोग, या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने द्यावे.
, पण वाचायचा राहिला असल्यास आपल्या माहितीसाठी या ब्लॉगच्या माध्यमातून पुर्नप्रसिद्ध करत आहोत.रिपोर्टर