Sunday, January 16, 2011

झी २४ तास...एक पाऊल पुढे ?

 
टीआरपीसाठी चॅनल्समधली मारामारी हा विषय काही नवा नाही. किंबहुना टीआरपीसाठी अनेकवेळा संवंग गोष्टी दाखवणे याबद्दलही चॅनल्सना फार काही खेद नसतो. पण गेल्या आठवड्यात झी २४ तास या वृत्तवाहिनीवर हितगुज या कार्यक्रमाअंतर्गत एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. कुणीतरी एक महामंडलेश्वर बाबा या कार्यक्रमात आला होता, आणि आपण सहा महिन्यांत एडस् सारखा दुर्धर आजार बरा करतो, असा त्याचा दावा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कुठेही चॅनलचे संपादकीय मंडळ या मुद्याशी सहमत आहे किंवा नाही, याबाबत खुलासा करण्यात आलेला नव्हता. कार्यक्रम जर जाहिरातीचा होता तर तसेही कुठे नमूद करण्यात आले नव्हते. कार्यक्रमाचे स्वरूप पाहता हा कार्यक्रम पेड कार्यक्रम असावा अशी पुसटशी शंका येते. किमान संपादक महाशयांनी तरी आपली भूमिका डिसक्लेमरच्या माध्यमातून स्पष्ट करायला हवी होती.

समाजातील नैतिकता, राजकारण ाबाबत रोखठोक भूमिका मांडणा-या झी २४ तासच्या संपादकांना याचा विसर पडला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. झी २४ तासवर यापूर्वी अनेकवेळा अंधश्रद्धा निर्मूलन करणारी वृत्त प्रसारित झाली आहेत. पण एकिकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रसार करायचा, आणि दुसरीकडे सर्रास एडस् निर्मुलनाच्या कार्यक्रमासाठी बाबा, महाराजांना बोलवायचे...हे अंमळ खटकलचं परब साहेब. आता परब साहेब कदाचित म्हणतील की, कार्यक्रमाचे शीर्षक प्रश्नांकित होते. पण किमान झी २४ तास...एक पाऊल पुढे..असे म्हणणा-यांनी तरी कथनी आणि करनीमधला फरक सांभाळायला हवा.