Sunday, January 2, 2011

'म' मराठीचा...'म' मुळयेंचा !

     

ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अभिरूप न्यायालयात ज्येष्ठ पत्रकार निला उपाध्ये यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्स या पुरवणीत वापरल्या जाणा-या मराठी भाषेवर जोरदार प्रहार केला. उपाध्ये बाईंच्या या प्रहारामुळे प्रहारमधील मंडळी एकदम खूश झाली आहेत. कारण मराठी भाषेते अभिजात रुप आपणच साकारतो, याचा त्यांना जाज्वल्य अभिमान आहे. त्यामुळे हा विषय प्रहारमध्ये चांगलाच चर्चेत आहे. (पूर्वाश्रमीचे मटाकर्मी या चर्चेत स्वाभाविकपणे आघाडीवर आहेत !) पण संमेलनाच्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून झालेला हल्ला मुंबई टाइम्सचे संपादक असणा-या प्रवीण मुळये यांच्या जिव्हारी लागला आहे. डोक्यावरचे केसही शिल्लक नसल्यामुळे आता काय आणि कुणाचे ओढावे (केस) याबाबत ते चिंतातूर झाल्याचे कळते. मुळये मुळचे कोकणातले. त्यात आडनावात फसगत झालेले. तरीही ते बहुजन मित्रांसोबत बोलतात तेव्हा मात्र आपली मुळची भाषा वापरतात. पण महाराष्ट्र टाइम्स नावाच्या आळीमध्ये जातात तेव्हा तेही मुटांची भाषा वापरू लागतात. पण त्यांच्यावर अचानक झालेल्या या हल्यामुळे ते भलतेच व्यथित झाले आहेत. त्यावर त्यांनी तत्काळ पुण्याचा दौरा केल्याचेही वृत्त आहे. त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठेला भेट देऊन भाषा आणि त्याचा उगम या विषयावर दोन दिवस अध्ययन केले आणि संशोधन केल्याचे समजते.
साधारणपणे थर्टी फस्टला लोक पिण्यात जातात, पण हे पुण्यात गेले. त्यामुळे त्यांच्या पुरोगामीपणाबद्दलही लोकांचा आदर वाढला आहे. पण पुण्यात जाऊनही त्यांना शुद्ध मराठी सापडली नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर त्यांनी संमेलन जिथे झाले, त्या परिसरात (ठाण्यात) जाऊन फेरफटका मांडला. पण तिथेही आता जत्रा आटोपल्यामुळे काहीच उत्तर सापडले नाही. अखेर त्यांनी आता अमेरिका अथवा इंग्लडसारख्या देशाचा दौरा करण्याचा विचार मनात आणल्याचे समजते. अजून हा विषय त्यांच्या मनातच आहे. त्यांनी तो मुख्य संपादकांना बोलून दाखविलेला नाही. त्यांचा मनात एकदा विचार पक्का झाला, तर तो विषय मग संपादकांना आणि कंपनीला पटवून देणे त्यांना अवघड नाही... त्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. (असो)
मुंबईसह मुंबईतील अनेक गोष्टी इंग्रजांनी उभ्या केल्या. त्यामुळे ज्या इंग्रजांमुळे मराठी भाषा इंग्रजाळली त्यांच्याकडेच मराठी भाषेच्या शुद्धतेचा आणि अस्सल मराठीचा भवानी फॉम्युला असेल असे मुळये यांना वाटत असावे. नाही तरी मराठी लेखक मराठी भाषेसाठी जर चिंतनशील काही करायचे असेल तर परदेशातच जातात, असा आजवरचा इतिहास त्यामुळे परदेशगमनाने काही साधता येईल का, यावर मुळये यांच्या विचारांचे विमान मनात घिरट्या घालत असल्याचे कळते.