Monday, January 24, 2011

व्यर्थ न हो गेट टुगेदर...


दोन आठवड्यांपूर्वी ई-टीव्हीच्या माजी विद्यार्थ्यांचं, सॉरी कर्मचा-यांचं गेट टुगेदर मुंबईत झालं. आम्हाला त्यावेळीच त्याची माहिती मिळाली होती, पण त्यात दखल घेण्यासारखं काही घडलं नसल्यामुळे त्याचा उल्लेख आमच्या ब्लॉगमध्ये केला नव्हता. आता इतक्या दिवसांनी त्याचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे त्यात घेतलेल्या आणाभाका आणि त्याची पूर्तता करण्यासाठी न उचललेली पावलं.
या स्नेहमेळाव्यात ई-टीव्हीच्या लॉंचिंगवेळी असलेल्या टीमपैकी २०-२५ जण जमले होते, अशी माहिती मिळाली आहे. या कार्यक्रमाचे अनधिकृत संयोजक आणि आता टाईम्स नाऊमध्ये अर्णब गोस्वामींचा उजवा हात असलेले शैलेश लांबे यांनी यातून काही जणांना हेतुपूर्वक वगळल्याबद्दल नाराजीचा सूर उमटला होता. त्यावर लांबे यांनी 'पुढले मोठे गेट टुगेदर करण्यासाठी ही चाचपणी होती' असे राजकीय उत्तर (मध्ये दोन-तीन शिव्या टाकून - थॅंक्स टू टाईम्स नाऊ) दिले होते म्हणे... या स्नेहमेळाव्यात जमलेल्या अशोक सुरवशे (साम), सागर गोखले (साम), सुहास घटवाई (आयबीएन-लोकमत), मेघराज पाटील (स्टार माझा) प्रभूतिंनीही याला अनुमोदन दिलं होतं, असं ऐकून आहोत. मात्र त्यानंतर सगळेच थंड झाल्याची भावना या गेट टुगेदरमधून डावललेल्यांची झाली आहे. त्यातील काहींनी आमच्याजवळ छुपी नाराजी व्यक्त केली आहे. ई-टीव्हीतल्या मूलगामी ग्रूपीझमचं भूत एक्स-ईटीव्हीयन्समध्येही पहायला मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. (ते बेलापूरच्या सकाळ भवनातही पोहोचलं आहे म्हणे...) मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन न होण्याची काही संशयित कारणं आम्हाला समजली आहेत.... ती अशी :
१) त्या कार्यक्रमामध्ये माननीय साहित्यिक दुर्देशजी सोनार यांनी एक कविता (तीच नेहमीची असणार.... लोडशेडींग) मानधन न घेता सादर केली म्हणे... लांबेच्या स्वप्नातलं १०० जणांचं गेट टुगेदर झालं, तर पुन्हा एकदा कविता मानधनाशिवाय म्हणावी लागेल, या भीतीने सोनार यांनीच या नियोजनात खोडा घातल्याचीही एकीकडे चर्चा आहे.
२) सध्या साममध्ये अंतर्गत कलह सुरू असल्यामुळे तेथे असलेले माजी ई-टीव्हीवाले गेट टुगेदरच्या मानसिकतेत नाहीत, त्यामुळे त्यांनी लांबे यांना पिना मारून कार्यक्रम न ठरवण्यासाठी गळ घातली आहे म्हणतात...
३) हल्ली मेघराज पाटील फक्त स्कॉच पितात... त्यांच्या महागड्या चैनीसाठी इतरांनी कॉंट्रिब्युशन का द्यायचं, असा खडा सवाल काही 'ओल्ड मंक'वाल्यांनी केल्याचं ऐकिवात आलंय...
पण आमच्या मते खालचं कारण सर्वात चपखल असू शकेल...
४) दोन आठवड्यांपूर्वी झालेलं सिलेक्टिव्ह गेट टुगेदर प्रेस क्लबच्या गच्चीवर झालं होतं. कार्यक्रम संपवून हलत-डुलत-ठेचकाळत क्लबच्या पाय-या उतरताना पुन्हा जास्त लोकांसह भेटण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या होत्या. तेव्हा केलेली इमोशनल चर्चा दुस-या दिवशी सकाळी कशाला आठवतेय?

Sunday, January 23, 2011

पडघम...

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकरांपासून माधव गडकरींपर्यंत अनेकांना विराजमान होता आले नाही.... हे महाराष्ट्राच्या काळजातील एक शल्य आहे. तेवढेच मोठे शल्य मंत्रालयातील तमाम पत्रकारांच्या मनात असते ते म्हणजे मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्षपद मिळाले नाही याचे...
सध्या निवडणूका जाहीर झालेल्या आहेत. आचारसंहिता लागू झालेली आहे. आम्हीही पत्रकारच आहोत. त्यामुळे त्या निवडणुकांचा प्रचार वगैरे आम्ही करीत नाही. पण मंत्रालयात प्रवेश करणा-यांना सावध करण्यासाठी आम्ही हे सांगत आहोत. जर तुम्ही मंत्रालयात प्रवेश केला आणि तळजमजल्यावर फिरत असाल तर अचानक तुम्हाला कोणीतरी पकडून आम्हाला मतदान करा... तुम्ही पत्रकार आहात काय.... साहेब लक्षात ठेवा.... वगैरे वगैरे सांगणारा एखादा शशिकांत सांडभोर किंवा प्रवीण पुरो भेटले तर घाबरून जाऊ नका. बिचा-यांच्या प्रचाराची ती पद्धत आहे. निवडणुकीत साम, दाम किंवा दंड, भेद वगैरे काहीतरी करायचे असते ना तसेच ते सध्या वागत आहेत.
तुम्ही काहीही म्हणा पण यावेळी निवडून येतील पुरो...आमचे हे अंदाज लक्षात ठेवा. आम्हीही राजकीय विश्लेषक आहोत. त्यामुळे आमचे अंदाज हमखास खोटे ठरतात. तरीही आम्ही छातीठोकपणे सांगत आहोत निवडून येतील पुरो... संजीव शिवडेकर आणि सुरेंद्र गागंण यांचं काही खरं नाही. लोकांनी यांना डोक्यावर चढवलंय आणि तेच त्यांना गोड बोलून आपटतील. कारण एरवी हे हवेत राहणार... हे मोठे पत्रकार... यांनी गिफ्ट घेतलं... आणि काही घेतलं तर या हाताचे त्या हाताला कळणार नाही. पण बाकी बिचा-या पत्रकारांना नाव ठेवणार... आता म्हणतात आम्हाला निवडून द्या... प्रविण पुरोंची कशासाठी पाटीलकी करावी हेच कळंत नाही. छोट्यात छोटा पत्रकार ही प्रविण पुरोची जिथे दिसेल तिथे हजामत करतो.... मग अध्यक्ष झाल्यावर आणखी काय होणार... अनिकेत जोशी हेही यावेळी पुन्हा अध्यक्षपदासाठी उतरले आहेत आणि खोपकर हेही आहेतच. दोघेही बहुधा अध्यक्षपदाचे आजीव उमेदवार होणार असे दिसतेय. पण आता प्रचाराला वेग येणार आहे.
मयावती फॉम्युला आहे. वेगवेगळ्या आघाड्या आहेत. आमिष आहेत. आश्वासने आहेत. पाडापाडी आहे. बदनामी आहे. राजकारणातील सगळे डाव इथे खेळले जात आहेत. त्यामुळे पाहुयात, निकाल काय येतो तो. आम्ही आमचा अंदाज तुम्हाला सांगितला आहेच. शिवाय आमचे अंदाज किती खरे ठरतात हेही सांगितले आहे. आम्हाला कुणाचाही प्रचार करायचा नाही कारण आम्हीही सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे पत्रकार आहोत...

Friday, January 21, 2011

निखिल वागळे आगे बढो...

तिनही मराठी वृत्तवाहिन्यांवर असलेल्या संपादकीय चर्चात्मक कार्यक्रमात निखिल वागळे यांचा आजचा सवाल म्हणजे प्रेक्षकांसाठी ग्रेट भेटच ! गेली तीस वर्षे सडेतोड पत्रकारिता करणा-या वागळेंचे वैशिष्ट्य म्हणजे समोर कुणीही असो...समोरच्याला फाडून खाण्यात त्यांचा हात कुणी धरणार नाही. २१ जानेवारीला रात्री नेहमीप्रमाणे आजचा सवाल सुरू झाला. विषय होता, ग्रॅहम स्टेन्स हत्याकांडात दारासिंगला झालेली शिक्षा पुरेशी आहे का ? , इतका गरम विषय...अपेक्षेप्रमाणे चर्चा रंगली...आणि दरम्यान कार्यक्रमातील एक वक्ते, सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांनी काही आरोपांच्या फैरी झाडल्या. (वागळे साहेब तुमचे मत आम्हाला मान्य असल्यामुळेच वर्तक काय वदले ते इथे नमूद करत नाही), त्यानंतर वागळे यांनी वर्तक यांना झाप झाप झापले...वागळेंचा मुद्दा अत्यंत तर्कशुद्ध होता...किंबहुना असे भान जर आजच्या प्रत्येक पत्रकारांनी दाखवले तर काही प्रमाणात नैतिकता पाळल्यासारखे होईल. केवळ वागळे यांची स्तुती करण्यासाठी हे लिखाण नाही. आपल्यापैकी अनेकजणांनी तो कार्यक्रम पाहिलाही नसेल. पण माहिती काढण्यात सराईत असलेल्या पत्रकारांनी त्या कार्यक्रमात नेमके काय झाले आणि वागळेंनी कशा पद्धतीने एकूण कार्यक्रम सादर केला याची माहिती अवश्य घ्यावी. असो...

Thursday, January 20, 2011

मंत्रालयात रणधुमाळी !

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या निवडणुकांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे याही निवडणुका जातीपातीच्या राजकारण करूनच खेळल्या जातात. किंबहुना त्या जातीपातीचे राजकारण करूनच जिंकता येतात. सध्यातरी असे चित्र आहे. पूर्वी काय होते देव जाणे. पण अवघे शंभर मतदार असणा-या या संघाच्या निवडणुका आणि त्या निमित्ताने होणारे राजकारण राजकारण्यांनाही लाजवणारे आहे. यावर्षी शशिकांत सांडभोर आणि प्रवीण पुरो हे दोन पत्रकार अध्यक्षपदाच्या रेसमध्ये आहेत. वर्षभर त्यांचे लॉबिंग सुरू झाले आहे. आता त्यांना आपण अध्यक्ष व्हावे असे वाटू लागले आहे. त्यामुळे आपला टूर्स आणि टड्ढॅव्हल्र्स व इतर व्यवसाय अधिक तेजीत चालू शकतील, असे त्यांना वाटते आहे. दुसरे उमेदवार शशिकांत सांडभोर ते सध्या टिव्ही जर्नेलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तरी त्यांना विधिमंडळ आणि मंत्रालय वार्ताहर संघाचा मोह का पडला आहे त्यांनाच माहीत नसेल. मागच्यावर्षी त्यांनी प्रयत्न केला पण तो फसला. आता पुन्हा ते आपली लॉबी गोळा करू लागले आहेत. पण एकीकडे ते मतदार गोळा करीत जातात आणि दुसरीकडे आपल्या फाटक्या तोंडाने सगळेच गमावत जातात. मेहनत करणारा, अभ्यास असलेला आणि चवळीतून आलेला हा पत्रकार पण त्याने तोंड उघडले की सगळ्याची किमत शून्य होते. विशेष म्हणजे या निवडणुकांची चर्चा सुरू झाली की एका माणसाचा सर्वजण शोध घेतात तो माणूस म्हणजे नितिन सावंत. पूर्वी म्हणे नितिन सावंत म्हणेल तो माणूस निवडून यायचा. पण आता त्यांना कोण विचारत नाही. त्यांच्याकडे एक गट्टा मते राहिलेली नाहीत. सध्या सामनाने त्यांना त्या बिटवरही ठेवलेले नाही. तरीही हे उमेदवार त्यांचा आशीर्वाद घ्यायला का जातात, हे ही न सुटलेले कोडे आहे. असाच कोकणातील एक माणूस म्हणजे किरण नाईक. निवडणूक लढवणारा प्रत्येक उमेदवार त्यांचीही मनधरणी करतो. पण किरण नाईक यांचीही अवस्था नितिन सावंत सारखीच आहे.
यावेळी सुरेंद्र गांगण आणि संजीव शिवडीकर यांच्यासारखे चागंले पत्रकार या निवडणुकीत उतरले आहेत. टीका करणारी सुरेंद्रसारखी माणसं अशा सिस्टममध्ये यावी लागतात. त्यांना आत आल्याशिवाय कळंत नाही की, बाहेरून बोलणे किती सोपे असते ते. त्यांना म्हणे इथला भ्रष्टाचार निपटायचा आहे. पाहू आम्ही त्यांचा सत्कारच करू.
एकूण काय तर मंत्रालयात आता पत्रकारांच्या राजकारणाने वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारांची मनधरणी आता सुरू झाली आहे. पाट्र्याही दिल्या जातील.
बरं हा सगळा लढा कशासाठी याचे उत्तर मिळत नाही पण अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मिळणारी बॅग आणि दिवाळी गिफ्ट याच्यातच या चुरशीचे गुपीत वर्षानुवर्षे दडलेले असावे असा जाणकरांचा अंदाज आहे.

अशीही पळवापळवी !

आयबीएन लोकमतचा अँकर मुश्ताक खान हा झी 24 तासच्या वाटेवर आहे. मंगळवारी 18 तारखेला झी 24 तासचे संपादक मंदार परब यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतला. मुश्ताकचे आयबीएन सोडण्याचे कारण काय ते कळू शकले नाही. मात्र तो तिथे नाराज असल्याचे कळाले. स्टार माझा इतर चॅनेल्समधील अँकर त्यांच्या चॅनेलमध्ये घेत नाही. आयबीएन लोकमतमध्येही झी 24 तासमधल्या अँकर्सला घेत नाहीत. अपवाद फक्त सामचा. सामने झीचे दोन अँकर घेतले. मात्र झी 24 तासमध्ये इतर चॅनेलच्या अँकर्सला प्राधान्य दिले जाते. यामुळे झी 24 तासच्या डेस्कवरील काही जणांना अँकर्स स्क्रीन टेस्ट द्यायला सांगण्यात आलंय, त्यांचे काय होणार ? असा प्रश्न निर्माण झालाय. चॅनेल सोडून जाऊ नये म्हणून त्यांना अँकर टेस्ट देण्याचा मार्ग सुचवण्यात आला होता की काय ? अशी ही चर्चा सुरू आहे. प्रतिस्पर्धी चॅनेल्स झी 24 तासच्या अँकर्सला पाण्यात पाहतात. मग झी 24 तासमध्ये इतर चॅनेल्सच्या अँकर्सला का बोलावले जाते ? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
(
मिळालेल्या माहितीवरून)

Wednesday, January 19, 2011

महाराष्ट्र टाइम्सच्या मुख्य वार्ताहरपदी जयंत होवाळ

 
महाराष्ट्र टाइम्सच्या मुख्य वार्ताहरपदाची सुत्रे नुकतीच जयंत होवाळ यांना सोपवण्यात आली आहेत. मावळते मुख्य वार्ताहर समीर कर्वे यांना विशेष वृत्ताची जवाबदारी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून गडकिल्ले, डोंगरद-या, निसर्गभ्रमण, आदी विषयांवर न झालेले लिखाण पुन्हा एकदा कर्वे जोमाने सुरू करणार असल्याचे समजते.जयंत होवाळ यांची मुख्य वार्ताहरपदाची निवड होणार असल्याची कुणकुण लागल्यानंतर, नेहमीच मांजरीसारख्या दबक्या पावलाने चालणा-या रवीन्द्र मांजरेकर यांनी आपल्याला हे पद मिळावे म्हणून ऊर्जा खर्च केल्याची चर्चा मटामध्ये आहे. मात्र मांजरेकरांचे गॉडफादर गेल्याचे महिन्यात निवृत्त झाल्याने मांजरेकरांचे गणित चुकले. त्यामुळे मग आपल्या पायाभूत सुविधा कायम राखत त्यांनी आता होवाळांचे नेतृत्त्व मान्य केल्याचीही चर्चा मटामध्ये चवीने रंगवली जात आहे.

राहुल गडपाले मुंबई मिररमध्ये

सकाळमध्ये म्हाडा बीट यशस्वीरित्या सांभाळणारे राहुल गडपाले आता मिररमध्ये रुजू होणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई मिररमध्येही त्यांच्यावर म्हाडा बीटचीच जवाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.

Sunday, January 16, 2011

झी २४ तास...एक पाऊल पुढे ?

 
टीआरपीसाठी चॅनल्समधली मारामारी हा विषय काही नवा नाही. किंबहुना टीआरपीसाठी अनेकवेळा संवंग गोष्टी दाखवणे याबद्दलही चॅनल्सना फार काही खेद नसतो. पण गेल्या आठवड्यात झी २४ तास या वृत्तवाहिनीवर हितगुज या कार्यक्रमाअंतर्गत एक धक्कादायक गोष्ट पाहायला मिळाली. कुणीतरी एक महामंडलेश्वर बाबा या कार्यक्रमात आला होता, आणि आपण सहा महिन्यांत एडस् सारखा दुर्धर आजार बरा करतो, असा त्याचा दावा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कुठेही चॅनलचे संपादकीय मंडळ या मुद्याशी सहमत आहे किंवा नाही, याबाबत खुलासा करण्यात आलेला नव्हता. कार्यक्रम जर जाहिरातीचा होता तर तसेही कुठे नमूद करण्यात आले नव्हते. कार्यक्रमाचे स्वरूप पाहता हा कार्यक्रम पेड कार्यक्रम असावा अशी पुसटशी शंका येते. किमान संपादक महाशयांनी तरी आपली भूमिका डिसक्लेमरच्या माध्यमातून स्पष्ट करायला हवी होती.

समाजातील नैतिकता, राजकारण ाबाबत रोखठोक भूमिका मांडणा-या झी २४ तासच्या संपादकांना याचा विसर पडला आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. झी २४ तासवर यापूर्वी अनेकवेळा अंधश्रद्धा निर्मूलन करणारी वृत्त प्रसारित झाली आहेत. पण एकिकडे अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रसार करायचा, आणि दुसरीकडे सर्रास एडस् निर्मुलनाच्या कार्यक्रमासाठी बाबा, महाराजांना बोलवायचे...हे अंमळ खटकलचं परब साहेब. आता परब साहेब कदाचित म्हणतील की, कार्यक्रमाचे शीर्षक प्रश्नांकित होते. पण किमान झी २४ तास...एक पाऊल पुढे..असे म्हणणा-यांनी तरी कथनी आणि करनीमधला फरक सांभाळायला हवा.

Thursday, January 13, 2011

अन्यथा : लेख उत्तम झालाय !

नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या मंचावरून संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी गावकुसाबाहेर असलेल्या मराठी भाषेला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची जी भूमिका मांडली, ती भूमिका साहित्यिक कितपत स्वीकारतील माहित नाही. पण लोकमान्य लोकशक्ती असलेल्या लोकसत्तेने तरी ती आत्मसात करायला सुरुवात केल्याचे दिसते. बुधवार (१२ जानेवारी) रोजी प्रसिद्ध झालेल्या करियर वृत्तान्त या पुरवणीच्या माध्यमातून बहुधा लोकसत्तेने ही सुरुवात केल्याचे जाणवते. करियर वृत्तान्त पुरवणीच्या चौथ्या पानावर परदेशी शिक्षण - एजंट निवडताना या शीर्षकाअंतर्गत प्रशांत ओचावार यांनी एक मार्गदर्शनपर लेख लिहिला आहे. वर्तमानपत्रात जी प्रस्थापित भाषा आहे, तिला छेद देणारी अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ विद्यापीठ हा शब्द विध्यापीठ किंवा न्यूझीलंड हा शब्द न्यू झीलंड अशा प्रकारे लिहिला आहे. लोकसत्तेने हा सदोष लेख (या लेखाला सदोष म्हणावे का हे आम्हाला माहित नाही) छापण्यासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेतलाय का, हे त्यांनाच माहित. पण भाऊ आम्हाला थोडं खटकलचं !
असो...एकेकाळी आपण लालबावटयाखाली काम केल्याची आठवण संपादकांच्या कानावर जाईल, अशा पद्धतीने चर्चा करणा-या
प्रसाद केरकर यांनी बहुधा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे धोरण उत्तम पद्धतीने राबवायला सुरुवात केली आहे. कांबळे साहेब तुमच्यावर टीकास्त्र सोडणा-या लोकसत्तेने तुमची गावकुसाबाहेरच्या भाषांबद्दलची भूमिका आत्मसात केल्याबद्दल किमान तुम्ही तरी आता त्यांचे कौतुक करा राव !

Tuesday, January 11, 2011

बाकी आशिषराव तुमचं कौतुक आम्हालाच !

आशिष जाधव या धडाडीच्या पत्रकाराला यावर्षी पत्रकार दिनाला एकही पुरस्कार जाहीर झाला नाही, याचे आम्हाला अत्यंत दु:ख झाले. म्हणून आम्ही त्याचा गौरव करण्याचे ठरवले आहे. त्याची धडपड वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, तो गोड मानून घ्यावा. हवंतर हाच आमचा आजचा सवाल आहे, असे समजा.
आशिष जाधव हा विदर्भासारख्या मागासलेल्या भागातून आलेला एक धडपड्या पत्रकार. तो दिवसभर किती धडपड करीत असतो, ते टीव्हीवरून उभा महाराष्ट्र लाईव्ह पाहत असतो. निखिल वागळेंनंतर आयबीएन लोकमतवर दिसणारा आणि मंगेश चिवटे नंतर राजकारण्यांना भिडणारा हा एकमेव पत्रकार आहे. त्यांचे कौशल्यच असे आहे की, त्यांनी ज्या सराईतपणे कोकणातील दोन ९६ कुळी मराठ्यांना एकावेळी आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्याला काही तोड नाही. आम्ही अमेय तिरोडकर आणि विनोद तळेकर यांच्याविषयी बोलतोय... पण हे बिचारे आशिषबद्दल बोलताना किती अदबिने बोलतात..तर मुद्दा आहे, आशिष जाधव यांना पुरस्कार न मिळाल्याचा. गल्लीबोळातील अनेक पत्रकार पुरस्कार मिळवतात आणि आशिष जाधव यांची दखल का घेतली जाऊ नये म्हणून वाईट वाटते एवढचं.
आता हे पाहाना, मध्येच ते गडचिरोली आणि चंद्रपूरच्या अभयारण्यात म्हणजेच अरण्यात गेले. त्यांनी नक्षलवाद्यांशी थेट संवाद वगैरे साधला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या हद्दित घुसणे हे काय सोपे आहे. त्या भागात जायचे तर एक तर वाघ, नक्षलवादी आणि आबा या तिघांची परवानगी घ्यावी लागते. पण आशिष जाधव यांनी या तिघांचीही परवानगी घेतली नव्हती म्हणे... अर्थात ते रोजच वाघाच्या सहवासात राहत असल्यामुळे त्यांना कशाचीही भिती वाटत नसावी...
असो पण, आयबीएन लोकमतने त्यांची दखल घेतली आहे बरे झाले... ते लोकसत्तेत उपसंपादक की काय होते, पण त्यांना एकदम पोलिटीकल पत्रकार केले आणि लवकरच पोलिटीकल संपादक करण्यात येणार आहे म्हणे... हेही तेच सांगत असतात म्हणून आम्हाला माहीत... कारण बिचारा हा धडपड्या पत्रकार स्वत:बद्दलच फक्त चांगले बोलतो. स्वतःविषयी चारचौघात चांगले बोलणे केवढे धाडसाचे आहे, हे लक्षात आले असेलच आपल्या. त्यामुळे त्यांची दखल घेऊन पुरस्कारासाठी विचार करावा लागेलच आपल्याला. कोणत्याही संघटनेने केला नाहीतर बिचा-या आबांनाच सांगावे लागेल. कारण नव्या मुख्यमंत्र्यांशी अजून त्यांची घसट झालेली नाही. याला कारणही बहुधा चव्हाणच असावेत. कारण पहिल्या चव्हाणांच्या ठेचेतून दुसरे चव्हाण शहाणे झाले असल्याने पत्रकारांशीही तोलूनमापून संबंध ठेवतात, असे ऐकिवात आहे. असो...बाकी आशिषराव तुमचं कौतुक आम्हालाच !

Sunday, January 9, 2011

पत्रकारांचा सामना !

कामगारांची एवढी मोठी बलाढ्य युनियन चालवणा-या किरण पावसकर यांना शिवसेना सोडावी लागली. पावसकर यांना कामगारांचे राजकारण कळले, पण त्याच पावसकरांनी सामना या सेनेचे मुखपत्र असलेल्या कार्यालयातील काम करणा-या कामगार आणि कर्मचा-यांकडून थोडेफार जरी धडे घेतले असते तर तर त्यांना शिवसेना सोडावी लागली नसती....आमचे हे वाक्य पत्रकारीतेत असलेला आणि सामनाचे ऑफीस माहित असणारा कोणीही सुज्ञ पत्रकार खोडून काढू शकणार नाही. किंबहुना हे वाक्य सामना कार्यालयातील माणसेही मान्य करतील. असो.शिवाजी पार्कला उभे राहून भाषण केल्यासारखे बोलून चालणार नाही म्हणून आम्ही केलेल्या विधानाचे काही दाखलेही आपल्याला देतो.आता हे पहा सुरेंद्र मुळीक... हा माणूस स्वत: न लढता अनेकांना इतक्या वर्षे चांगल्या प्रकारे लढवू शकला. त्यामुळे सामनाच्या कार्यालयात अनेकजण नेते झाले आणि त्यांनी स्वत:ची खाट पाडून घेतली. पण मुळीक हे लढवय्ये नेते म्हणून आजही कार्यालयात आपला आब राखून आहेत. आणि हो ते पत्रकारही आहेत बरे...त्यांच्या बातम्या...हो आम्ही पहिल्या पानावरील बातम्यांविषयीच बोलत आहोत... किती 'अर्थ'पूर्ण असतात... काही अर्थ असल्याशिवाय मुळीक बातम्याच लिहित नाही...हे पहा विद्याधर चिंदरकर... हा या कार्यालयातील सर्वांच्याच हिट लिस्टवरचा माणूस... पण अनेक संकटे आली गेली तरी त्यांनी आपली खुर्ची कशी टिकवली हे शिवसेनेतून गेलेल्या नारायण राणे, गणेश नाईकांपासून छगन भुजबळापर्यंतच्या अनेक नेत्यांना कळले नाही. नारायण राणे यांनी प्रहार हे दैनिक सुरू केल्यानंतर यावर प्रहारमधील हुषार आणि तज्ज्ञांची एक समिती गठीत केली आहे. चिंदरकर यांच्याकडे कोणता फेविकॉल आहे, याचा शोध ही समिती घेत आहे...हे पहा चीफ रिपोर्टर गजानन सावंत... यांचा आदर्श घ्या... चिंदरकरांच्या शब्दाबाहेर जायचे नाही. साहेब म्हणतील तसे वागायचे आणि आपली खुर्ची टिकवायची ही कला त्यांच्या व्यतीरिक्त अन्य कुणाला जमेल का... बातम्या कुरवाळणे म्हणजे काय हेही त्यांच्याकडूनच शिकावं म्हणे... रात्री बारापर्यंत ते पानांचा पसारा कुरवाळंत बसतात... आता सगळ्यांबद्दल इथे सांगणे शक्य नाही कारण जागेची कमतरता आहे... आणि माणसं जास्त आहेत. म्हणजे सामनामध्ये छापून येणाèया बातम्या आणि पानं यांचा जरी ताळमेळ घातलात तरी माणस जास्त सापडतील... यामध्ये संजय राऊत यांचा निराधाराना आधार देण्याचा जो दयाळू प्रयत्न आहे, त्यातून ही निराधार योजना उभी राहिली आहे. नाहीतर इतकी माणसं इथे कशी सापडली असती... अजून बरीच आहेत. माधव डोळे... उन्मेश गुजराथी वगैरे वगैरे...विशेष म्हणजे ही सगळी कोकणी माणसं
किंवा
... कोकणातून आली. परळ डेपोत उतरली की त्यांना पहिल्यांदा सामनाचे ऑफीस दिसते. मग बिचा-यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. परवा महाराष्ट्र टाइम्समध्ये खेळ विभागात बातम्यांशी खेळ करणाèया एक गृहस्थांनाही सामनाने आपल्या विशाल पोटात सामावून घेतले. कारण ते परब आहेत म्हणून. ज्या कोकणाने शिवसेनेला रसद...ताकद दिली त्या कोकणातील माणसांना मुंबईत सामनाने हक्काचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याबद्दल ही माणसं केवढी ऋणी वगैरे आहेत, पण निवडणूक आली की झाडून मनसेला मतदान करतात. म्हणजे किती गोष्टी पावसकरांसारख्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत... बाळा नांदगावकर स्नेहल जाधव यांना जे जमले, त्याचे धडे मात्र त्यांनी याच सामनाच्या कार्यालयातून घेतले असावेत.... जय महाराष्ट्र !!!

Thursday, January 6, 2011

पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !

 
सर्व पत्रकार मित्रांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा !
 

Wednesday, January 5, 2011

लोकसत्तात चाललयं तरी काय ?

नेहमीप्रमाणे सकाळी दारात पडणा-या चार-पाच वर्तमानपत्रांचा गठ्टा दारात पडला. अर्धवट झोपेत तो गठ्ठा घरात आणला आणि सवयीने झोपेतच लोकसत्ता चाळला...आणि पुन्हा साखरझोपेच्या लाटेवर स्वार झालो. पण काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे वाटले आणि परत उठून लोकसत्ता हातात घेतला आणि चाळला. पहिले पान नेहमीप्रमाणे सॉलिड. पण दुस-या पानावरच्या बातमीचा मथळा ( मुदतीपूर्वीच उचलबांगडी झालेले डांगे हे चौथे मुख्य सचिव ! ) आणि त्याखाली छापून आलेले वृत्त २५ हजार व्होल्टचाच झटका बसला...रिपोर्टर
...
-

Sunday, January 2, 2011

'म' मराठीचा...'म' मुळयेंचा !

     

ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अभिरूप न्यायालयात ज्येष्ठ पत्रकार निला उपाध्ये यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई टाइम्स या पुरवणीत वापरल्या जाणा-या मराठी भाषेवर जोरदार प्रहार केला. उपाध्ये बाईंच्या या प्रहारामुळे प्रहारमधील मंडळी एकदम खूश झाली आहेत. कारण मराठी भाषेते अभिजात रुप आपणच साकारतो, याचा त्यांना जाज्वल्य अभिमान आहे. त्यामुळे हा विषय प्रहारमध्ये चांगलाच चर्चेत आहे. (पूर्वाश्रमीचे मटाकर्मी या चर्चेत स्वाभाविकपणे आघाडीवर आहेत !) पण संमेलनाच्या एवढ्या मोठ्या व्यासपीठावरून झालेला हल्ला मुंबई टाइम्सचे संपादक असणा-या प्रवीण मुळये यांच्या जिव्हारी लागला आहे. डोक्यावरचे केसही शिल्लक नसल्यामुळे आता काय आणि कुणाचे ओढावे (केस) याबाबत ते चिंतातूर झाल्याचे कळते. मुळये मुळचे कोकणातले. त्यात आडनावात फसगत झालेले. तरीही ते बहुजन मित्रांसोबत बोलतात तेव्हा मात्र आपली मुळची भाषा वापरतात. पण महाराष्ट्र टाइम्स नावाच्या आळीमध्ये जातात तेव्हा तेही मुटांची भाषा वापरू लागतात. पण त्यांच्यावर अचानक झालेल्या या हल्यामुळे ते भलतेच व्यथित झाले आहेत. त्यावर त्यांनी तत्काळ पुण्याचा दौरा केल्याचेही वृत्त आहे. त्यांनी पुण्यातील सदाशिव पेठेला भेट देऊन भाषा आणि त्याचा उगम या विषयावर दोन दिवस अध्ययन केले आणि संशोधन केल्याचे समजते.
साधारणपणे थर्टी फस्टला लोक पिण्यात जातात, पण हे पुण्यात गेले. त्यामुळे त्यांच्या पुरोगामीपणाबद्दलही लोकांचा आदर वाढला आहे. पण पुण्यात जाऊनही त्यांना शुद्ध मराठी सापडली नाही. त्यामुळे त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यानंतर त्यांनी संमेलन जिथे झाले, त्या परिसरात (ठाण्यात) जाऊन फेरफटका मांडला. पण तिथेही आता जत्रा आटोपल्यामुळे काहीच उत्तर सापडले नाही. अखेर त्यांनी आता अमेरिका अथवा इंग्लडसारख्या देशाचा दौरा करण्याचा विचार मनात आणल्याचे समजते. अजून हा विषय त्यांच्या मनातच आहे. त्यांनी तो मुख्य संपादकांना बोलून दाखविलेला नाही. त्यांचा मनात एकदा विचार पक्का झाला, तर तो विषय मग संपादकांना आणि कंपनीला पटवून देणे त्यांना अवघड नाही... त्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. (असो)
मुंबईसह मुंबईतील अनेक गोष्टी इंग्रजांनी उभ्या केल्या. त्यामुळे ज्या इंग्रजांमुळे मराठी भाषा इंग्रजाळली त्यांच्याकडेच मराठी भाषेच्या शुद्धतेचा आणि अस्सल मराठीचा भवानी फॉम्युला असेल असे मुळये यांना वाटत असावे. नाही तरी मराठी लेखक मराठी भाषेसाठी जर चिंतनशील काही करायचे असेल तर परदेशातच जातात, असा आजवरचा इतिहास त्यामुळे परदेशगमनाने काही साधता येईल का, यावर मुळये यांच्या विचारांचे विमान मनात घिरट्या घालत असल्याचे कळते.

कुबेरांचा षटकार् !

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी लोकसत्ताच्या संपादकीय पानावर गिरिश कुबेर यांनी ८४ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि सकाळचे समुह / मुख्य संपादक उत्तम काबंळे यांच्यावर लिहिलेला विशेष लेख प्रसिद्ध झाला आणि पत्रविश्वात चर्चांना चांगलेच उधाण आले.गिरिश कुबेर यांचा उत्तम कांबळे यांच्यावरील लेख आपल्या वाचनात आला असेलच

-

अन्यथा :कांबळे उत्तम झाले!

 नुकत्याच पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने उत्तम कांबळे यांनी मराठी सारस्वतांची, समीक्षकांची जी काही गोची केली आहे, तिला तोड नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावर चर्चा, टीकाटिप्पणी होणे ही आपली परंपरा. पण यावेळी एक ब्र नाही निघाला कांबळे यांच्या साहित्य संमेलनाच्या भाषणावर. आता काहींना असे वाटायची शक्यता आहे की या सार्वत्रिक शांततेचे कारण कांबळे यांच्या साहित्यिक उंचीत दडलेले आहे. पण तसे नाही. या शांततेच्या मागे आहे ती कांबळे याची व्यावसायिक खुर्ची. कांबळे नुसते साधे साहित्यिक नाहीत. ते एका दैनिकाचे संपादक आहेत. त्यामुळे अनेक लेखकुंनी विचार केला, त्यांना कशाला दुखवा. उद्या त्यांच्या पेपरातल्या एखाद्या साप्ताहिक सदरासाठी, ते जमत नसेल तर रविवार किंवा एखाद्या विशेष पुरवणीसाठी त्यांच्याकडे आपल्याला जावे लागेल. कांबळे यांच्यावर टीका केली तर यावर पाणी सोडावे लागणार. परत त्याच्या जोडीला आपल्यातलाच कोणी गेल्यावर प्रतिक्रिया छापण्यासाठी आपल्याला मान्यवर म्हणून फोन येणार नाहीत आणि वर वर्धापन दिनाच्या पानसुपारीला बोलावणारही नाहीत, बोलावल्यास आपला फोटो छापणार नाहीत, अशीही भीती अनेकांना चाटून गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतके सगळे धोके पत्करण्यापेक्षा त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देणे टाळल्याने काही जग बुडत नाही असा सुज्ञ विचार आपल्या साहित्यिक मंडळींनी केला असावा. पण हा प्रश्न नुसता या गरीब बिचा-या साहित्यिकांचा नाही. संपादक कांबळे आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले असल्याने अनेक प्रश्न आता नव्याने उपस्थित होणार आहेत. आता पुढच्या वर्षभराच्या काळात साहित्य मंहामंडळावर समजा कोणी टीका केली तर कांबळे यांचे वर्तमानपत्र नक्की काय भूमिका घेणार. वर्षभर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला गावगन्ना भाषणे देत फिरावे लागते. ते काम आता कांबळे संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने करणार की एका वर्तमानपत्राचे संपादक या भूमिकेतून. परत या कालावधीत कांबळे यांच्यातला साहित्यिक कोठे असणार आणि संपादक नक्की कोणत्या टप्प्यावर जागा होणार, हे इतरांना कळणार कसे. एरवी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला ते संमेलन संपले की तितका मान दिला जातोच असे नाही. पण कांबळे यांचे तसे नाही. यंदा ही डबल बॅरल गन आहे. त्यामुळे ती जेथे कुठे वाजेल तेथे इतरांना नाही तरी त्यांच्या वर्तमानपत्राच्या वार्ताहरांना त्याची खबरबात घ्यावीच लागणार. कांबळे यांनी आपल्या भाषणात अन्यही काही महत्वाच्या विषयांना स्पर्श केला आहे, त्याचीही दखल घ्यावी लागेल. उदाहरणार्थ कांबळे विचारतात की नद्या नाले डोंगर, जंगले, धनिकांच्या सात बारावर जात असतील तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल.शब्दशः लाख मोलाचा सवाल आहे हा. पण त्यातून उपप्रश्न निर्माण होतो. तो असा की कांबळे यांनी हा सवाल साहित्यिक म्हणून विचारला की संपादक म्हणून. साहित्यिक म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला असेल तर संपादक या नात्याने त्यांना त्याचे उत्तर हवे तेव्हा मिळू शकले असते. आणि दुसरा मुद्दा असा की कांबळे यांचे वर्तमानपत्र ज्या शहरातून प्रकाशित होते त्या शहराला खेटूनच लवासा नावाचा प्रकल्प उभा रहात आहे. त्याची माहिती कदाचित साहित्यिक कांबळे यांना नसेलही. पण संपादक कांबळे यांना ती नक्की असेल. तर त्या लवासा प्रकल्पात अनेक आदिवासींची जमीन घेतली गेली असा आरोप आहे. त्या बाबत कांबळे यांनी कधी प्रश्न उपस्थित केल्याचे ऐकिवात नाही. या लवासा प्रकल्पासंदर्भात कांबळे यांची भूमिका काय, हा प्रश्नही या निमित्ताने त्यांना विचारायला हरकत नसावी. परत कांबळे असेही म्हणाले की, समाजात सुरू असलेल्या आर्थिक बदलामुळे नवे वर्ग किंवा समाज घटक तयार होत आहेत. विस्थापित, धरणग्रस्त, स्थलांतरित, प्रकल्पग्रस्त, सेझग्रस्त वगैरे वगैरे. बरोबर आहे कांबळे यांचेच म्हणणे. पण प्रश्न तोच. हा सवाल साहित्यिक म्हणून की संपादक म्हणून.आपल्या भाषणात कांबळे यांनी विचारस्वातंत्र्यावर चहुबाजुंनी होणाऱ्या आक्रमणाचीही दखल घेतली. तेही योग्यच झाले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षांनी अशी भूमिका घेण्याला देदीप्यमान इतिहास आहे. कधी कुणाच्या लेखनामुळे कुणाच्या भावना दुखावतील आणि स्फोटाचं रूप घेउन बाहेर पडतील, याचा नेम राहिलेला नाही. साहित्यिकांच्या लेखण्यांवरही मूलतत्ववाद आक्रमण करत आहे, असे कांबळे यांचे म्हणणे आहे. त्याबाबत कोणाचेही दुमत असायचे काहीही कारण नाही. प्रश्न आहे तो अशा आक्रमणांच्या निवडक निषेधाचा. राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांच्या आशिर्वादाने काही अतिरेकी संघटना सध्या फोफावलेल्या आहेत. पत्रकार, संपादकांवर हल्ला करण्यापासून ते पुण्यातील भांडारकर संशोधन संस्थेत नासधूस करण्यापर्यंत या संघटनांची मजल गेली आहे. या संघटनांना चार खडे बोल संमेलनाध्यक्ष कधी सुनावणार, याकडे आता समस्त सारस्वत परिवार नजर ठेवून आहे.पण अर्थात या त्रुटीदर्शनामुळे उत्तम कांबळे यांच्या मोठेपणाला बाधा पोहोचणार नाही. कांबळे काही नुसतेच थोर नाहीत. ते थोर थोर आहेत. त्यांच्या आत्मविश्वासाला दाद द्यवी तितकी कमीच. नव्या शतकाने आणलेल्या आधुनिकतेच्या संदर्भात बोलताना त्यांनी जाहीरच करून टाकले मी. म्हणजे ते.स्वत/ एक युग आहे म्हणून. आणि हे मत काही त्यांनी ठाण्याच्या साहित्य संमेलनातच व्यक्त केले असे नाही. याआधीही त्यांनी अशाच प्रकारची भावना व्यक्त केली होती. म्हणजे कांबळे यांना युगकर्तेच म्हणायला हवे, यात शंका नाही. तर आता कांबळे यांचे युग सुरू झाले आहे. या युगब्दास काही नतद्रष्टांनी नथुराम गोडसे, दादोजी कोंडदेव आदींचे विषय काढून खोडा घालण्याचा प्रयत्न केला. पण तो काही तितकासा यशस्वी झाला नाही. संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत नथुराम गोडसे याचा आदरयुक्त उल्लेख झाल्याने गंभीर वाद निर्माण होईल की काय, अशी शंका अनेकांना आली. पण तो प्रश्न राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी हाती घेतल्याने मुदलातच निकालात निघाला. तसा तो निघेपर्यंत आव्हाड यांनी दूरचित्रवाहिन्यांसमोर आगपाखड केली आणि आपल्या सात्विक संतापाचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. तो अगदीच केविलवाणा ठरला. कारण सात्विक संताप कसा व्यक्त झाला या पेक्षा तो कोणी व्यक्त केला, यालाच महत्व असते. एरवी हे साहित्य संमेलन म्हणजे पतंग उडवण्याची स्पर्धाच ठरले. हे पतंग बदवण्यात कांबळे यांच्या खालोखाल यशस्वी ठरले ते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. मराठी कलाकृतीला नोबेल मिळायला हवे, परत पुन्हा एकदा ज्ञानेष्टद्धr(२२४)वरीसारखी कलाकृती मराठीत जन्माला यावी, अशा इच्छा व्यक्त करण्याचे धाष्टर्य़ त्यांनी दाखवले. यावरूनच त्यांचा मराठी साहित्याचा संबंध किती तुटलेला आहे, याची जाणीव व्हावी. त्यांना काय माहीत मराठी कथा, कादंबरी लेखक सध्या मानवी संबंधांचा लैंगिक दृष्टीकोनातून वेध घेण्यातच आणि तो घेऊन झाला की लैंगिक संबंधांची मानवी संबंधांच्या अनुषंगाने मांडणी करणारे साहित्य प्रसवण्यातच मग्न आहेत. असो. पण साहित्य संमेलन उत्तम झाले. आता कांबळे यांना वीर सावरकर नगरीतून आपले ज्वालाग्राही विचार मांडावे लागले हा काव्यगत न्याय म्हणायचा की साहित्यिक योगायोग, या प्रश्नाचे उत्तर ज्याने त्याने द्यावे.
, पण वाचायचा राहिला असल्यास आपल्या माहितीसाठी या ब्लॉगच्या माध्यमातून पुर्नप्रसिद्ध करत आहोत.रिपोर्टर