Monday, January 24, 2011

व्यर्थ न हो गेट टुगेदर...


दोन आठवड्यांपूर्वी ई-टीव्हीच्या माजी विद्यार्थ्यांचं, सॉरी कर्मचा-यांचं गेट टुगेदर मुंबईत झालं. आम्हाला त्यावेळीच त्याची माहिती मिळाली होती, पण त्यात दखल घेण्यासारखं काही घडलं नसल्यामुळे त्याचा उल्लेख आमच्या ब्लॉगमध्ये केला नव्हता. आता इतक्या दिवसांनी त्याचं स्मरण होण्याचं कारण म्हणजे त्यात घेतलेल्या आणाभाका आणि त्याची पूर्तता करण्यासाठी न उचललेली पावलं.
या स्नेहमेळाव्यात ई-टीव्हीच्या लॉंचिंगवेळी असलेल्या टीमपैकी २०-२५ जण जमले होते, अशी माहिती मिळाली आहे. या कार्यक्रमाचे अनधिकृत संयोजक आणि आता टाईम्स नाऊमध्ये अर्णब गोस्वामींचा उजवा हात असलेले शैलेश लांबे यांनी यातून काही जणांना हेतुपूर्वक वगळल्याबद्दल नाराजीचा सूर उमटला होता. त्यावर लांबे यांनी 'पुढले मोठे गेट टुगेदर करण्यासाठी ही चाचपणी होती' असे राजकीय उत्तर (मध्ये दोन-तीन शिव्या टाकून - थॅंक्स टू टाईम्स नाऊ) दिले होते म्हणे... या स्नेहमेळाव्यात जमलेल्या अशोक सुरवशे (साम), सागर गोखले (साम), सुहास घटवाई (आयबीएन-लोकमत), मेघराज पाटील (स्टार माझा) प्रभूतिंनीही याला अनुमोदन दिलं होतं, असं ऐकून आहोत. मात्र त्यानंतर सगळेच थंड झाल्याची भावना या गेट टुगेदरमधून डावललेल्यांची झाली आहे. त्यातील काहींनी आमच्याजवळ छुपी नाराजी व्यक्त केली आहे. ई-टीव्हीतल्या मूलगामी ग्रूपीझमचं भूत एक्स-ईटीव्हीयन्समध्येही पहायला मिळत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. (ते बेलापूरच्या सकाळ भवनातही पोहोचलं आहे म्हणे...) मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन न होण्याची काही संशयित कारणं आम्हाला समजली आहेत.... ती अशी :
१) त्या कार्यक्रमामध्ये माननीय साहित्यिक दुर्देशजी सोनार यांनी एक कविता (तीच नेहमीची असणार.... लोडशेडींग) मानधन न घेता सादर केली म्हणे... लांबेच्या स्वप्नातलं १०० जणांचं गेट टुगेदर झालं, तर पुन्हा एकदा कविता मानधनाशिवाय म्हणावी लागेल, या भीतीने सोनार यांनीच या नियोजनात खोडा घातल्याचीही एकीकडे चर्चा आहे.
२) सध्या साममध्ये अंतर्गत कलह सुरू असल्यामुळे तेथे असलेले माजी ई-टीव्हीवाले गेट टुगेदरच्या मानसिकतेत नाहीत, त्यामुळे त्यांनी लांबे यांना पिना मारून कार्यक्रम न ठरवण्यासाठी गळ घातली आहे म्हणतात...
३) हल्ली मेघराज पाटील फक्त स्कॉच पितात... त्यांच्या महागड्या चैनीसाठी इतरांनी कॉंट्रिब्युशन का द्यायचं, असा खडा सवाल काही 'ओल्ड मंक'वाल्यांनी केल्याचं ऐकिवात आलंय...
पण आमच्या मते खालचं कारण सर्वात चपखल असू शकेल...
४) दोन आठवड्यांपूर्वी झालेलं सिलेक्टिव्ह गेट टुगेदर प्रेस क्लबच्या गच्चीवर झालं होतं. कार्यक्रम संपवून हलत-डुलत-ठेचकाळत क्लबच्या पाय-या उतरताना पुन्हा जास्त लोकांसह भेटण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या होत्या. तेव्हा केलेली इमोशनल चर्चा दुस-या दिवशी सकाळी कशाला आठवतेय?