Thursday, January 13, 2011

अन्यथा : लेख उत्तम झालाय !

नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या मंचावरून संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी गावकुसाबाहेर असलेल्या मराठी भाषेला मुख्य प्रवाहात सामावून घेण्याची जी भूमिका मांडली, ती भूमिका साहित्यिक कितपत स्वीकारतील माहित नाही. पण लोकमान्य लोकशक्ती असलेल्या लोकसत्तेने तरी ती आत्मसात करायला सुरुवात केल्याचे दिसते. बुधवार (१२ जानेवारी) रोजी प्रसिद्ध झालेल्या करियर वृत्तान्त या पुरवणीच्या माध्यमातून बहुधा लोकसत्तेने ही सुरुवात केल्याचे जाणवते. करियर वृत्तान्त पुरवणीच्या चौथ्या पानावर परदेशी शिक्षण - एजंट निवडताना या शीर्षकाअंतर्गत प्रशांत ओचावार यांनी एक मार्गदर्शनपर लेख लिहिला आहे. वर्तमानपत्रात जी प्रस्थापित भाषा आहे, तिला छेद देणारी अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ विद्यापीठ हा शब्द विध्यापीठ किंवा न्यूझीलंड हा शब्द न्यू झीलंड अशा प्रकारे लिहिला आहे. लोकसत्तेने हा सदोष लेख (या लेखाला सदोष म्हणावे का हे आम्हाला माहित नाही) छापण्यासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेतलाय का, हे त्यांनाच माहित. पण भाऊ आम्हाला थोडं खटकलचं !
असो...एकेकाळी आपण लालबावटयाखाली काम केल्याची आठवण संपादकांच्या कानावर जाईल, अशा पद्धतीने चर्चा करणा-या
प्रसाद केरकर यांनी बहुधा बहुजन हिताय बहुजन सुखाय हे धोरण उत्तम पद्धतीने राबवायला सुरुवात केली आहे. कांबळे साहेब तुमच्यावर टीकास्त्र सोडणा-या लोकसत्तेने तुमची गावकुसाबाहेरच्या भाषांबद्दलची भूमिका आत्मसात केल्याबद्दल किमान तुम्ही तरी आता त्यांचे कौतुक करा राव !