Tuesday, January 11, 2011

बाकी आशिषराव तुमचं कौतुक आम्हालाच !

आशिष जाधव या धडाडीच्या पत्रकाराला यावर्षी पत्रकार दिनाला एकही पुरस्कार जाहीर झाला नाही, याचे आम्हाला अत्यंत दु:ख झाले. म्हणून आम्ही त्याचा गौरव करण्याचे ठरवले आहे. त्याची धडपड वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, तो गोड मानून घ्यावा. हवंतर हाच आमचा आजचा सवाल आहे, असे समजा.
आशिष जाधव हा विदर्भासारख्या मागासलेल्या भागातून आलेला एक धडपड्या पत्रकार. तो दिवसभर किती धडपड करीत असतो, ते टीव्हीवरून उभा महाराष्ट्र लाईव्ह पाहत असतो. निखिल वागळेंनंतर आयबीएन लोकमतवर दिसणारा आणि मंगेश चिवटे नंतर राजकारण्यांना भिडणारा हा एकमेव पत्रकार आहे. त्यांचे कौशल्यच असे आहे की, त्यांनी ज्या सराईतपणे कोकणातील दोन ९६ कुळी मराठ्यांना एकावेळी आपल्या ताब्यात ठेवले आहे, त्याला काही तोड नाही. आम्ही अमेय तिरोडकर आणि विनोद तळेकर यांच्याविषयी बोलतोय... पण हे बिचारे आशिषबद्दल बोलताना किती अदबिने बोलतात..तर मुद्दा आहे, आशिष जाधव यांना पुरस्कार न मिळाल्याचा. गल्लीबोळातील अनेक पत्रकार पुरस्कार मिळवतात आणि आशिष जाधव यांची दखल का घेतली जाऊ नये म्हणून वाईट वाटते एवढचं.
आता हे पाहाना, मध्येच ते गडचिरोली आणि चंद्रपूरच्या अभयारण्यात म्हणजेच अरण्यात गेले. त्यांनी नक्षलवाद्यांशी थेट संवाद वगैरे साधला. गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या हद्दित घुसणे हे काय सोपे आहे. त्या भागात जायचे तर एक तर वाघ, नक्षलवादी आणि आबा या तिघांची परवानगी घ्यावी लागते. पण आशिष जाधव यांनी या तिघांचीही परवानगी घेतली नव्हती म्हणे... अर्थात ते रोजच वाघाच्या सहवासात राहत असल्यामुळे त्यांना कशाचीही भिती वाटत नसावी...
असो पण, आयबीएन लोकमतने त्यांची दखल घेतली आहे बरे झाले... ते लोकसत्तेत उपसंपादक की काय होते, पण त्यांना एकदम पोलिटीकल पत्रकार केले आणि लवकरच पोलिटीकल संपादक करण्यात येणार आहे म्हणे... हेही तेच सांगत असतात म्हणून आम्हाला माहीत... कारण बिचारा हा धडपड्या पत्रकार स्वत:बद्दलच फक्त चांगले बोलतो. स्वतःविषयी चारचौघात चांगले बोलणे केवढे धाडसाचे आहे, हे लक्षात आले असेलच आपल्या. त्यामुळे त्यांची दखल घेऊन पुरस्कारासाठी विचार करावा लागेलच आपल्याला. कोणत्याही संघटनेने केला नाहीतर बिचा-या आबांनाच सांगावे लागेल. कारण नव्या मुख्यमंत्र्यांशी अजून त्यांची घसट झालेली नाही. याला कारणही बहुधा चव्हाणच असावेत. कारण पहिल्या चव्हाणांच्या ठेचेतून दुसरे चव्हाण शहाणे झाले असल्याने पत्रकारांशीही तोलूनमापून संबंध ठेवतात, असे ऐकिवात आहे. असो...बाकी आशिषराव तुमचं कौतुक आम्हालाच !