Friday, December 24, 2010

रोहितभाऊ तुम्ही सुद्धा ?

 
मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छाकोट्यामुळे आजवर अनेकांचा गृहप्रवेश सुलभतेने झाला. किंबहुना ही एक परंपराच आहे. पण याच्या कधी बातम्या झाल्या नाहीत. कारण त्याचे बहुतांश लाभार्थी हे बातमीदारच होते. गृहलाभ झालेल्या अनेक बातमीदारांनी आपल्याला मिळालेली घरे यथावकाश विकली. पण या परंपरेला छेद देत प्रहार या नारायण राणे यांच्या मालकीच्या वर्तमापत्राने काही महिन्यांपूर्वी एक वृत्तमालिका प्रसिद्ध केली आणि आजवर किती पत्रकारांनी मुख्यमंत्री कोट्यातून घरे घेतली आणि त्यातील किती पत्रकारांनी ती घरे विकली, हे जनताजनार्दनासमोर मांडले. त्यानंतर मग या विषयावर अपेक्षेप्रमाणे बराच उहापोह झाला. अनेक वर्तमानपत्रांत आणि वृत्तवाहिन्यांतून यावर दळण दळले गेले. आता हे नमनाला घडाभर तेल यासाठी की, अलीकडेच इकोनॉमिक टाइम्स या वर्तमानपत्रात रुजू झालेल्या रोहित चंदावरकर यांनी CM's quota allottees make a killing on flat resale या मथळ्याखाली २3 डिसेंबरच्या अंकात हेच वृत्त पुन्हा दिले. मद्य जुनेच बाटली नवीन !वास्तविक एखादा वरिष्ठ बातमीदार एखाद्या नव्या वर्तमापत्रात रुजू झाला की, सुरुवातीला एखादे दणकेदार वृत्त देणे हा एक संकेत आहे. या संकेताचे पालन करताना एकदा छापून आलेले वृत्त परत देऊ नये, या संकेताला फाटा बसला. मात्र चंदावरकरांच्या यांनी दिलेले वृत्त कसे जुने आहे, याचा प्रसार ते ज्या इलेक्ट्रॉनिक मीडियातून पुन्हा प्रिंटमध्ये आले त्यातील वार्ताहरांनी २3 डिसेंबरच्या सकाळपासूनच एसएमएसद्वारे केला.
 
आपल्या अधिक माहितीसाठी रोहित चंदावरकर यांच्या मूळ बातमीची लिंक -
http://economictimes.indiatimes.com/markets/real-estate/news-/cms-quota-allottees-make-a-killing-on-flat-resale/articleshow/7148404.cms