Sunday, February 13, 2011

प्रतीक्षा भास्कराची

सध्या मराठी पत्रकार्यालयात एकच धामधूम आहे, जो तो आपला रिझ्युम अपडेट करण्यात मग्न झालाय. त्यामुळे अरे चल...मी निघतोय...बसू या का आज..वगैरे सहका-यांच्या निरोपाला...तू हो पुढे...मला जरा वेळ लागेल. एका लेखासाठी नेटवर बसायचे आहे असे सांगून एक दुस-याला कल्टी देण्यात येत आहे. या सगळ्यामागचं निमित्त आहे ते दिव्य भास्कराच्या उदयाचे. दिव्य मराठी नावाने नोंदणी होऊन हे नवे वर्तमानपत्र लवकरच मराठी वाचकांच्या भेटीला येणार आहे. मराठी वाचकांच्या आयुष्यात फारसा फरक पडणार नसला तरी मराठी पत्रपंडितांच्या आयुष्यात मात्र सुगीचे दिवस येणार आहेत. सध्या रिझ्युम अपडेटचे काम आणि नेमके कुणाला कॉन्टेक्ट करायचे याची माहिती मिळाली की, मग सुगीच्या दिवसांबाबत चर्चा करण्यासाठी पत्रपंडितांच्या हुरडा पार्ट्या प्रेस क्लब किंवा कार्यालयाच्या नजीकच्या मयखान्यात भरतील. तर मुद्दा आहे दिव्य मराठीचा. हे दिव्य कसे अवतरते याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. नवे वर्तमानपत्र सुरू होताना संपादक कोण यावर मात्र खुलेआम चर्चा सुरू झाली आहे. ज्यांच्या आडनावात कर आहे आणि ज्यांच्या पुढे कर जोडल्याशिवाय तूर्तास तरी मराठी पत्रकारितेत पर्याय नाही, अशा काही करामती व्यक्तींची नावे नेहमीप्रमाणे चर्चेत आहेत. केतकर, टिकेकर, खांडेकर, लाटकर वैगेरे...त्यामुळे याही मंडळींना अलीकडे सदिच्छांचे फोन कॉल्स आणि एसएमएस वाढले असल्याचे समजते. परंतु, प्रहार मुंबईत येतेवेळी ज्या पद्धतीने मंथन झाले होते , तसेच काहीसे आताही होईल असे बोलले जात आहे. मराठी पत्रकारांसाठी दुग्धशर्करा योग म्हणजे, प्रत्येक कार्यालयातून अपरेझलचे वारे वाहायला लागले असतानाच, नव्या वर्तमानपत्राची घोषणा झाल्याने आता अपरेझलच्या मुलाखतीसाठी संपादकापुढे जाताना प्रत्येक जण ताठ मानेने जाणार आहे...आणि आपल्या मूल्याचे प्रेझेंटेशन करणार असल्याचे समजते. असो...तूर्तास तरी आम्हाला प्रतीक्षा आहे ती भास्कराच्या उदयाची. एकदा उदय झाला की, मग होणारी हलचल आणि कुणाचे काम होऊ नये म्हणून जाणूनबुजून आमच्याच बांधवांकडून सोडण्यात येणा-या पुड्या...गॉसिप याची आम्हाला प्रतीक्षा आहे.